अलंग मदन - एक स्वप्नपूर्ती !!!

         मध्यरात्र उलटून तिसरा प्रहर सुरु झाला असेल. आंबेवाडीतील संपूर्ण साम्राज्य चांदण्याचा कुशीत गाढ झोपी गेलं आहे. अशातच दुरुन कानावर हळदीच्या ओव्यांचे गीत कानावर साद घालत आहेत . लखनच्या अंगणात चंद्र ताऱ्यांचा चंदेरी प्रकाशाचा सडा पसरलेला आहे. आम्हा अकरा जणांची तुकडी त्यातच झोपेचे सोंग घेऊन पहुडली आहे. वर डोकावले तर नभात चांदण्याचा पकडा पकडीचा खेळ चालू आहे. वाऱ्याची थंड झुळूक चक्क मार्च महिन्यातही अंगावर काटे येण्याइतपत आपले वर्चस्व दाखवत आहे. पण कलटणारी रात्र हळूहळू चांगलेच गारठ्याचे गोडवे मुखातून गायला लागली. आता यावर तोड म्हणजे फक्त होणारी पहाटच.

       अलंग-मदन-कुलंग सह्याद्रीचे त्रिकुट. सह्याद्रीतील सर्वात दुर्गम आणि अवघड असलेले किल्ले. पर्यटकांपासून थोडे वंचितच ,पण तितकेच वेड्या शौर्य ट्रेकर्सना साद घालणारे शिलेदार. काहींचा असा चुकीचा समज आहे कि,  जर हे तीन बेलाग किल्ले , हरिश्चंद्रगड असे काही काबीज नाही केले तर तुम्ही काय सह्याद्री बघितला. साफ चुकीचं! सह्याद्री म्हणजे फक्त ऎवढ मर्यादित नाही आहे. सह्याद्री म्हणजे!! आपला सह्याद्री..!! राकट ,अभेद्य,कणखर सह्याद्री. थंडी, ऊन , पावसात ताठ मानेने उभा राहणार सह्याद्री ..!! सह्याद्री म्हटलं कि डोंगराच्या अजस्त्र रांगा. मग ती पूर्व- पश्चिमेला कलनारी-कळसुबाई-त्र्यंबक रांग असो वा उत्तर दक्षिण अशी बागलाण कडून सुरु होणारी रांग. कुठे आभाळाला गवसणी घालणारे डोळे दिपवून टाकणारे उंच सुळके तर कधी दरीमधील खोल भीषणता दर्शवणारे .पण तितकेच ट्रेकर्सना आपल्या कुशीत घेऊन जवळ करणारे.  कितीही लिहिलं तरी सह्याद्री वरच प्रेमच हे अस की ते  शब्दात व्यक्त होणं खूप अवघड , ते फक्त स्वतः अनुभवल्यावर समजत....जिथे उडत्या पक्ष्याचाच पंखावरही शेवाळ उगवते , जिथे घोंगवणारा वारा डोंगर छेदून आपला मार्ग काढतो , जिथे झाडात झेप घेणाऱ्या वाघाला झुडूप कवटाळून घेतात , जिथे उंचच उंच कातळकडे आभाळाला भिडतात , जिथे सोनेरी किरणे शिवरायांचा गडकिल्ल्याचा मुखावरून उतरतात , जिथे दरी दरीतून फेसाळते पाण्याचे झरे कोसळतात , जिथे दररात्री अब्जावती नक्षत्रांचे सौदर्यसोहळे रंगतात ... सह्याद्रिचे रूपच निराळे ..!!



     अलंग-मदन-कुलंग हे नाव मला 2-3 सह्याद्रीत ट्रेक केल्यानंतर चांगलंच कानावर यायला लागल होत. पण हे गड दुर्गम आणि कठीण श्रेणी मध्ये गणला जातात. म्हणून सुरुवातीला थोडा या त्रिकुटण पासून लांबच राहिलो.पण जसा हळूहळू सह्याद्री मध्ये मी समरस होत गेलो. तशी ह्या त्रिकूटांची साद ऐकू येऊ लागली . पण काही केल्या दोन वर्ष समीकरणच जुळून येत नव्हती . हा तशी ती शाळेत असताना पक्की यायची. अखेर 18 मार्चचा मुहूर्त भेटला. अलंग आणि मदनचा . त्या मुहूर्ताला लागूनच काही अजून काही विपरीत मुहूर्त पण होते. अर्थातच बऱ्याच दिवसांनी बघायला भेटणारा आमच्यासारख्या क्रिकेट रसिकांचा भारत x पाकिस्तान  विश्वचषक टी 20 सामना. परत ऐन उनाळ्यातली गर्मीने होणारे हाल, त्यात आठवड्या पूर्वीच दुखणं घेतलेला हाथ . तेव्हा जाऊ कि नको जाऊ अशा व्दिधा मनस्थितीत पूर्ण आठवडा घालवून आदल्या दिवशी गपचूप बॅग भरली.

     दुसऱ्या दिवशी ऑफिस मधून येऊन राहिलेली थकबाकी बॅगेत भरली .रात्रीचे जेवण लवकर घेऊन कबड्डीचा (युमुम्बा  x पटना) अंतिम सामना बघत राहिलो. उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात मुंबई ने अंतिम क्षणाला कस खाल्ली आणि निकाल पटनाच्या बाजूने गेला. तसाच घरातून पाय आपटत बाहेर निघालो.रात्रीची जलद कसारा गाडी साडे अकराला मुलुंड वरून पकडली आणि गर्दीतील दरवाज्यातून कसाबसा आत शिरलो. पण कशी काय आज चांगल्या कर्माने माझ्या पाठीवरील बॅगचा आकार बघून प्रवाशांनी वर ठेवायला जागा करून दिली. आजूबाजूला माझ्यासारखेच संधान ट्रेक ला जाणारे जुने मित्र भेटले. ट्रेनने कल्याण पार केल्यावर माझ्याबरोबर ट्रेक ला येणारे सहभागी दिसले. गप्पा मारत मारत आम्ही साधारण रात्री दीड ला आम्ही कसारा स्टेशनला पोचलो. जेमतेम मोजून आम्ही फक्त अकरा जणंच, त्यात आठ वर्षाचा आदित्य ही होता. कडक उन्हाळाने तसेच लागून आलेल्या मुहर्ताने पण असू शकतील. पण जेवढा कमी समूह तेवढीच तितकीच मजा हे आता चांगलंच माहिती पडलं आहे.त्यातले पण पाच-सहा जण जुने ओळखीचे निघाले. लगेच स्टेशनचा बाहेर येऊन आधीच ठरवलेल्या गाडीत बॅग वर टाकून सगळे बसलो. कर्जत-कसारा घाट -घोटी-आंबेवाडी असा प्रवास चालू झाला. पण या अडीच तासाच्या प्रवासात थंडीचा फटकारा चांगलाच कानावर बसला वाटेत थोडी चहा पाणी झालं. पण ती फक्त वरच्यावरची मलमपट्टीच.


     आंबेवाडीत पोचलो तेव्हा हळदीच्या सुरांच्या गायनाशिवाय गाव पूर्ण गाढ झोपले होते. थोड्याच वेळात एकामागोमाग एक सगळे त्या सुरांत सूर मिळवायला लागले. पण मला काही या गारठ्यात झोप येईना. मी, आनंदा आणि कादंबरी, आम्ही पूर्ण रात्र झोपायचा असह्य प्रयत्न करून कुडकुडत काढली. थोडावेळ साठी डोळा लागतो ना तोच पायाखाली काही मला ओढत आहे अशा भास होताच जाग आली. उठून बघितले तर चक्क कुत्र्यांचा पिल्लांचा 4-5 जणांचा घोळका माझी चादर ओढत आहे. एव्हाना चांगलच उजाडलाच होत . आम्हां बरोबर सारी वाडी जागी झाली होती . आज वाडित ऐकाच  लग्न असल्याने चांगलीच लगभग दिसत होती .पण इकडे मयूर अजुनही मयूर कुंभकर्णचा अवतराताच होता .सकाळचा चहा आणि पोहेंचा नाश्ता पटापट आवरला . ओळखपरेख करून वाडीतील कैलास ला घेऊन त्रिकुटांकडे आम्ही सगळे  रवाना झालो.








     एव्हाना सकाळची सोनेरी किरणे कळसूबाई कडून अंगावर येत होती. वाडीतून खुजे दिसणारे त्रिकुट जसजसे जवळ  येत होते , तसा त्यांचा पसारा डोळ्यांत मावत नव्हता . झपाझप पावले टाकत पायाखालील धुराळा उडवत रानात आलो . वाटेत झराच थंड पाणी घशातून टाकून पुढे लागलो तेच थोड्या वेळाने हनुमान शिल्प  लागले . कातळावर कोरलेल्या चिन्हांची  कैलास कडून पूर्वीच्या व्यापारी मार्गाची माहिती समजली . कालांतराने तो गुप्त मार्ग नष्ट झाल्याचे समजले . श्रीफळ आणि अगरबत्ती हनुमानशिल्प ला वाहून मनोनामी नमस्कार करून पुढे निघालो.  

अलंगचा पायथ्याचा कातळाला जवळ केले.  तापलेला कातळ आणि गरम वारा अंगावर घेत उभी चढण चढू लागलो. आता पाठीवरील बॅग च ओझं चांगलच जाणवायला लागलं होत . मी प्रवीण ची मोठी बॅग घेऊन आल्याने आनंदा ला आयती शिकार भेटली. त्यात रात्रीचा जेवनाच थोडं सामान भरलं , मनातल्या मनात प्रवीण ला शिव्या देऊन चालत होतो . उन्हाचा तडाखा  चांगलाच सगळ्यांना बसला. मयूर ला जरा जास्तच पडला. कसेबसे रडतखडत आम्ही सगळे अलंगच्या पायथाच्या गुहे पाशी येऊन धडकलो .

     आनंदा ने घाई करत रोप आणि इतर साहित्य घेऊन मदन कडे  रवाना झाला.  मी , मयूर आणि वैभव सोडून बाकी सगळे त्यांचासोबत गेले. त्यांचा सेटअप होईपर्यंत थोडा वेळ गुहेत च थांबलो . साधारण २०-३० मिनिटांनी आराम करून  आम्ही दोघंच मयूर ला अलंग चा गुहेत सोडून मदन ला निघालो . सगळ्यांचा बॅगा तिथेच होत्या नि माकडांची चाहूल पण लागली होती आणि मयूर ला थोडी विश्रांती ची गरज होती . अलंग-मदन ज्यासाठी ओळखला जातो तो प्रचंड ट्रॅव्हर्स.. (एकाच पातळीवरील आडवी वाट).  वाटेतील अवघड ट्रॅव्हर्स आनंदा दा ने रोप लावून सुरक्षित केला होता. उजव्या हाताला खड्या कातळाची सोबत आणि डाव्या हाताला पोटात गळा आणणारी दरी..तो पार करून जसा जसा मदन चा जवळ जात होतो तसा मयूरने संगितल्या   प्रमाणे  z आकाराच्या रेखीव पायऱ्या लक्ष वेधून घेत होत्या. अलंग चा गुहेतून मदन कडे जाणाऱ्या ट्रॅव्हर्स ने तीस मिनिट घेतली. थोड्या पायऱ्या चढून मदन चा चढाईचा जागेवर आलो.







         आम्ही पोहचेपर्यंत  कैलास ने चढाई करून रोप लावून मार्ग सुरक्षित केला होता आणि आनंदा खाली आम्हाला मार्गदर्शनाला .  आम्हाला मग एक एक करून बिले घेऊन सगळे वर चढाई करून गेलो.कातळावरील चढाईची मजाच काही वेगळी असते. वर आल्यावर पाण्याचे टाके लागले. अजूनही महिनाभर पुरेल एवढे पाणी शिल्लक होते. पुढे अजून मदन चा पायऱ्या लागल्या त्या पूर्ण करत सगळ्यात मदन चा शिखरावर गेलो. वाटेत एक गुहा पण लागली. मुक्कामासाठी चांगली प्रशस्त आहे. . समोर अलंग चे पठार नजरेच्या टप्प्यात होते , त्याचा बाजूलाच कळसुबाई , खुट्टा , रतनगड सर्व काही 180 चा कोनात दिसत होते .




पुन्हा पायऱ्या उतरत आम्ही सगळे पायऱ्या उतरत पुन्हा रोप लावलेल्या जागी आलो. एक मागोमाग नंबर तर लागलेच होते . त्यात आवराआवर करत असताना कादंबरी ची बॅग दोन तीन घोलांट्या घालत  दरीचा कडेवर जाऊन थांबली . तर  इकडे आनंदाने  रॅपलिंग चा सेट उप मध्ये गुंग असताना माझा बाजूला काढून जमिनीवर ठेवलेला सनग्लासेस हवेचा जोराने अगदी टोकावर गवतात अडकला . कैलाश ने हळूच घेतला . आज नशिब आमच्या बाजुने होते.  आम्ही मग पटापट खाली उतरलो. पुन्हा लागलेल्या पायऱ्या उतरून ट्रॅव्हर्स ने अलंग चा गुहेत आलो. जाम सपाटून भूक लागलेली. सगळ्यांनी मस्त पैकी कादंबरी ने आणलेल्या सगळ्यांसाठी चपाती आणि मी आणलेल्या श्रीखंड याचा फडशा पाडला. बाकीच मध्ये मध्ये चटर-पटर बराच काही पोटात गेलं. नंतर सगळे पुढंच्या अलंग चा चढाई साठी तयार झाले.


अलंग चा पायथ्याचा गुहेचा डाव्या बाजूला एक साधारण  25 फूटांचा पायऱ्या तुटलेला पहिला टप्पा लागला. आता खरी सगळ्यांची कस लागणार होती. कारण जड बॅग घेऊन चढाई करण कठीण होत.एक एक करून वर गेले. शेवटी मी आणि मयूर खाली राहिलो. पाठीवर बॅगच वजन घेऊन वर चढण कठीण वाटत होतं. मयूर ला बोललो माझी बॅग जास्तच जड आहे . तो बोलला माझी बॅग घे मग तसाच त्याला हात जोडून समोर चढाईला लागलो. कारण त्याचा बॅगेत काय काय सामान (रात्रीच जेवणाचं सामान अगदी टोपासहित) आहे ते मला चांगलंच ध्यानात होत. बॅग जड असल्याने ती एका बाजूला जात होती पण थोडे दहा फूट वर गेल्यावर सोपं वाटलं .मग 25 फुटाचा टप्पा आणि पायऱ्या चढून आल्यावर अलंग चा 2 ऱ्या टप्प्यावर आलो. अलंग ची ती 50-80 फूट कातळ चांगली सपाट वाटत होती . मराठेशाही बुडवण्याच्या १८१८ सालच्या कॅप्टन ब्रिग्ज या अधिकाऱ्याच्या धडक कारवाईत इंग्रजांचे धोरण गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्यानुसार त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले. त्‍यात अलंग-मदन-कुलंगगड, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्‍यादी किल्‍ल्‍यांचा समावेश होतो.  त्यात हरिहर त्याच मोहक पायऱ्यांमुळे वाचला. अजूनही सुरंग लावलेल्या सफेद खुणा कातळावर दिसून आहेत. 


कैलास आणि आनंदा ने चढाई करून मार्ग सुरक्षित करून घेतला होता  एका बाजूला दुसरा सेट लावून बॅगा रोप ने वर ओढून घेतल्या. नंतर कादंबरी ने पूर्ण टेक्निकल चढाई केली. 


थोडाफार चढाईचा मार्ग लक्षात आला नंतर एका मागोमाग एक असे सगळे चढाई साठी नंबर लागले. सतत वर बघाव लागत असल्याने मान दुखायला लागली म्हणून थोडा बाजूला जाऊन बसलो. समोर आंबेवाडीतील कौलारू घर दिसत होते. गार हवा अंगाला लागत होती , क्षणभर त्या डोळे मिटून घेतले. थोड्या वेळाने बघितलं बाजूला होणारा आवाज बंद झाला होता. तिकडे जाऊन बघितल तर मयूर आणि आनंद(सहभागी) सोडून सगळे वर गेले होते. मग माझा नंबर होता. पटापट चढाई करत 15 फूट वर गेलो. आणि नंतर कळत च नव्हते कुठे जायचे . मयूर ने मग सांगीतले तसे डावीकडे गेलो. मग थोडा आत्मविश्वास आला. वरून आनंदा ने होल्ड( पकडायची जागा) सांगितले तसे करत गेलों. नंतर पुन्हा 2 फुटांचा ट्रॅव्हर्स मारून मध्ये आलो. या कातळावर हा सर्वात कठीण भाग होय , तसा तर पूर्ण मार्ग च कठीण आहे . नंतर थोडा अजून जोर लावून दहा फूट चढाई करून कातळ पुरा केला. मी वर आल्यावर मी केलेली चढाई बघून आनंदा बरोबर सगळे भलतेच खुश झाले. आनंद वर आल्यानंतर मयूर मग सेट उप काढत वर आला. तोपर्यंत आम्ही अलंग ला वर जाण्यासाठी कातळ कोरीव पायऱ्या चा मार्गी लागलो. आता चूक करण्याचा काही प्रश्नच नव्हता , कारण ती शेवटची चूक ठरली असती. पायऱ्यावरती होल्ड आहेत तरी बाजूला दिसणारी दरी अंगावर काटा आणते. एव्हाना बाजूला मदतीला आनंदा ने रोप लावलेला होताच. पायऱ्या चढून अलंगच्या पठारावर आलो. अलंगच्या पठारावर कातळात कोरलेल्या दोन प्रशस्त गुहा आहेत .तिथे जाताना समोर च पहिले शिवलिंग लागते. त्याच पुढे पिण्यायोग्य टाके आहे, थोडं पाणी तोंडावर मारून घेतले. मग अलंग चा गुहेत बॅगा टाकून बाहेर आलो. एव्हाना सूर्य मावळतीला आला होता. हळूहळू समोर चे सोनेरी किरणे किरणे कुलंग चा मागे लुप्त झाली. दिवसभराचे केलेलं कष्ट त्या सौंंदर्य सोहळ्याने दूर केले. अंधार होण्याचा आता थोडी लाकडं रात्रिचा जेवण्यासाठी जमवली.








        तोपर्यंत खाली दरीत गावात दिवे चमकू लागले आणि काजळीचे राज्य पसरले .मग रात्रिचा जेवणाचा सामान जवळ करत सगळे मदत करायला लागले. त्यात कादंबरी आणि आनंदाने मुख्य कारागीर होते बाकी आम्ही बाकी सगळे फक्त मदतनीस. सगळे या कामामध्ये गुंतले असताना अचानक कोणाला तरी इंडिया वि. पाकिस्तान ची मॅच ची आठवण झाली. मग झालं सुरू  या टोकावरून त्या टोकावर कुठे नेटवर्क भेटत का , कारण कोणाला कॉल करून किती स्कोर झाल्याचं कळतं का. दर 10 मिनिटांनी तेच स्कोर कळण्यासाठी तेच चालू होतं. तोपर्यंत इथे जेवण पूर्ण झालं . भूकेला पोटी पटापट सगळ्यांनि ताव मारून घेतला, दिवसभराचा थकवटी नंतर असे रुचकर जेवण म्हणजे शर्करायोगच..!!


 तोपर्यंत तिकडे इंडियाने सामना जिंकला होता. इकडे दिवस भर चा थकावतीने हळूहळू सगळे झोपायला गेले . अब्जावती ताऱ्यांच्या मैफलीत आम्ही तिघे -चौघे  जुने ट्रेकिंग चे विषय घेऊन गप्पा मारत बसलो. त्यात मस्त गार वारा अंगाला लागत होता. त्यात खूप काही विषय निघाले. नंतर आटोपता घेऊन सकाळी लवकर उठून सूर्योदय बघायला जाऊ असे ठरवून झोपी गेलो. आज हवेचा गारवा काही गुहेमध्ये आत झोपल्याने जाणवला नाही.आजची झोप समाधानी होती यात काहि शंकाच नाही.

    सकाळी पाच वाजता मयूर ची हाक आली. आजूबाजूला जेवढे उठतील त्यांना घेऊन गुहेतून बाहेर येऊन अलंग चा माथ्यावर गेलो. बाजूला पाण्याचा दश रेखीव टाकी लागल्या. या टाक्यात बारमाही पाणी असते .एका बाजूला एकुलत्या एक राज वाड्याची भिंत अजूनहि इतिहासाची साक्ष देत होती .



एव्हाना जुंझुमुंजू होइला लागली होती. धावत धावतच सूर्योदय दिसतो त्या ठिकाणी आलो. आकाशात मस्त तांबडं फुटलेल पण सूर्य काही वर आला नव्हता. तिकडेच वाट पाहत बसलो. थोड्या वेळाने ढगात लपलेला सूर्य आमच्या अपेक्षापेक्षा खालूनच दिसला . किती अभूतपूर्व नजरा होता.अजून एक आयुष्यातला सोनेरी क्षण . अलंगचा सूर्योदय.. !! 



डोळ्यात अभूतपूर्व नजारा साठवून घेतला . पुढे अलंग पठारावर फेरफटका मारत  दुसऱ्या टोकापर्यंत गेलो. समोर आजोबा आणि घाटघर चा परिसर दिसत होता . अलंगचा सगळा पसारा बघून आम्ही परत  गुहेत आलो. आणि जो काही आमच्यावर कादंबरी ने आघात झाला की पूर्ण गुहा हलून गेली. खूप दिवसांनी का होईना गडावर तुंबळ युद्ध झालं . त्यात आनंदा होताच खंजर घेऊन . अखेर मी शरणागती पत्करली. कारण तिला न घेताच आम्ही सगळे गेलो होतो. नंतर काही स्पष्टीकरण न देता ,त्यांनी केलेला मसाले भात वर तुटून पडलो , सोबतीला मॅगी पण रेडी होती. पण मसालेभात ची चव काही औरच होती. खूप दिवस जिभेवर रेंगाळत राहिली.  



मॅगी आणि चहा घेऊन पटापट आवरत आम्ही सगळे गुहेतून गड सोडला. अलंग चा पायऱ्या राम राम मरा मरा करत खाली उतरत होतो. एका बाजूूला पकडायला कातळात कोरलेल्या खोबण पकडत खाली आलो  .पुन्हा गुहेत बॅग टाकली , सगळ प्रस्तरोहनाच सामान घालूूून अगदी डिसेंडर सहित तयारीत बाहेर आलो.  तर रॅपलिंग चा चांगलाच सराव झाला असल्याने उतरणं काही अवघड नाही गेलं . पहिला टप्पा ५० फुटाचा कातळावरून खाली उतरलो.
 





     आनंदा ,कादंबरी , कैलास आणि मी सोडून , बाकी सगळ्याना मयूर पुढचा 25 फुटाचा टप्पा उतरवून पुढे आंबेवाडीचा मार्गाला घेऊन गेला. इकडे आनंदा आणि कादंबरी ने पुन्हा एकदा अलंगचा भिंतीवर हात मारून घेतला.


  

नंतर आम्ही एक एक रोप काढुन खाली उतरलो आणि अलंग चा पायथ्याचा गुहेतून मार्गाला लागलो . पटापटा उतरत हनुमान शिल्प गाठलं. पुढे गेल्यावर उतरत असताना अचानक निसटत्या दगडावर पाय पडला नि धडपडलो. पायाला चांगलाच मुका मार बसला .तरी कसाबसा चालत आंबेवाडीत आलो.  लखनचा अंगणात  पोहचल्यावर बूट काढून बघितला तर पाय चांगलाच सुजला होता  होता. थोडी मलमपट्टी करून लगेच लखन कडे जेवायला बसलो. वाडीत आज लग्न असल्याने चांगलीच वर्दळ दिसत होती. जेवण करून बाहेर येतो  तोच गाडी समोर उभीच होती. पटापट आवरून कसाऱ्याला लागलो.

   गेल्या दोन दिवसात खूप काही शिकलो, पुन्हा नवीन आयुष्यभराचे मित्र दिले ,कठीण प्रसंगी संकटाना सामोरे जाण्याची शक्ती दिली , आपण निसर्गापुढे किती खुटे आहोत याची पुन्हा एकदा त्याने जाणीव करून दिली . पण सह्याद्री च प्रेम च तस एकदा का माया लागली की गाठ सुटत नाही . यावेळी दोन महिन्याचं विकतच का होईना पण सुखद दुखंण घेऊन आलो ..













Comments

Post a Comment

Popular posts from this blog

The Mighty-Legendary-alluring Dudhsagar Waterfall.

Karoli Ghat .. One of a Mesmerizing Experience